01 April 2020

जाती- धर्म

TEACHER-2

जाती-धर्म

     आपण कोणत्याही व्यवसायात असलो तरी आपल्याला बरेच अनुभव येत असतात. आणि जर का तुम्ही शिक्षक असाल तर समाजातील अनेक प्रकारच्या, अनेक विविध तर्हेच्या माणसांशी, विद्यार्थ्यांशी संबंध येत असतो, अनेकविध अनुभव घेता येत असतात. सध्याच्या परिस्थितीत आपल्या समाजात जात-धर्म हा विषय खूप जिव्हाळ्याचा झाला आहे. त्याविषयी आलेला एक अनुभव......
     माझ्या मते तर मी देवळपेक्षा पवित्र काय असेल तर ती शाळा अस समजतो. कारण एकवेळ देवळात भेदभाव होईल, अन्याय होईल पण शाळेत होणार नाही. शाळेचं वातावरणच तस धर्म-निरपेक्ष असत. तिथं सगळ्या प्रकारची, जातीची, पंथाची, धर्माची मुलं एकत्र बसत असतात, शिकत असतात, एकमेकांचा घास सुद्धा आनंदाने खात असतात. शाळेत शिक्षक सुद्धा कधी मुलांच्या मध्ये कसलाच भेदभाव करत नाहीत (अणि तसं कोण करत असतील तर त्यांनी तो करुसुद्धा नये).


माझ्यासोबत शाळेत घडलेले दोन प्रसंग:-
(विनोद आंबी:- 9960688784)
     1) त्यादिवशी चौथीच्या पुस्तकातील छ. शिवाजी महाराजांचा एक धडा शिकविल्यानंतर मी मुलांना सांगितलं की सर्वांनी उद्या येताना आपल्याला आवडणाऱ्या थोर व्यक्तींच्या बद्दल माहिती सांगावी. दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांनी माहिती सांगितली पण ती सांगताना एक गोष्ट लक्षात येत होतं की प्रत्येक मुलानं त्या थोर व्यक्तींना जाती धर्माच्या आधारावर वाटून घेतलं होतं. प्रत्येक विध्यार्थी आपल्या जातीच्या चौकटीबाहेर विचार करत नव्हता. मला ते बघून आश्चर्य तर वाटलंच पण वाईट जास्त वाटलं की आपण मुलांना त्या चौकटीबाहेर काढू शकलो नाही.
     2) त्याच मुलातील एकानं मला विचारलं की सर तुम्ही मराठा अहात का? मी म्हंटल मी कोण आहे ते गेट बाहेर विचार, शाळेत तर माझी एकचं जात आहे. शिक्षकाची. पण तुला अस का वाटलं अस जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की सर तुम्ही कायम शिवाजी महाराजांबद्दल बोलत असता, फोनवर त्यांचा फोटो ठेवता म्हणून मला तस वाटलं. म्हणजे या मुलांनी थोर व्यक्तींना जातीवादी सुद्धा ठरवून टाकलंय. जो शिवाजी महाराजांबद्दल बोलतो तो मराठा, जो आंबेडकरांना चांगलं म्हणतो तो बौद्ध, वगैरे......
     आधी तर वाटलं की अस अपल्यामुळंच तर झालं नसेल, पण नंतर विचार केल्यानंतर अस लक्षात आलं की याला आपण नाही तर त्यांचे पालकच जास्त जबाबदार आहेत. होय पालकच. जोपर्यंत विध्यार्थी शाळेत असतो तो कधीच जात बघून सोबत बसत नाही की खात नाही. पण जेव्हा तो शाळेतून घरी जातो तेव्हा त्याच्या मनात जात-धर्माबद्दल या गोष्टी येतात कुठून? त्यासाठी त्याचे पालक, समाज जबाबदार असले पाहिजेत. प्रत्येक मुलाच्या पालकांनीसुद्धा अश्या जातीय अंधानिकरणापासून आपल्या मुलांना दूर ठेऊन सुसंस्कृत पिढी घडविली पाहिजे. प्रत्येक जाती धर्मात चांगल्या गोष्टीच सांगितल्या आहेत त्या त्यांनी आपल्या मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. पालकांबरोबर आपल्या समाजानेसुद्धा आपापसात भेदभाव न ठेवता भविष्यातील सुजाण नागरीक घडविण्यासाठी मुलांवर योग्य ते संस्कार करायला हवेत. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
।।जय हिंद।।

No comments:

Popular Posts