किल्ला
आज सहज बाजारात फेरफटका मारत असताना सगळीकडे दिवाळीच्या
खरेदीची लगबग दिसत होती. जागोजागी नवीन कपडे, रांगोळी, आकाशकंदील यांचे स्टॉल
मांडलेले दिसत होते. समोरच्या चौकात एक बाई आपल्या लहानग्या मुलाला घेऊन दिवाळीसाठी
खेळणी विकत बसलेली होती. लहानपणी मलासुद्धा तश्या खेळण्यांची आवड होती त्यामुळे न
रहावल्यामुळे मी त्या स्टॉल जवळ गेलो. तिथे प्लास्टर पासून बनवलेली विविध खेळणी
ज्यामध्ये छ . शिवाजी महाराज, त्याचे विविध पोशाख घातलेले मावळे, दुधाचे हांडे
डोक्यावर घेऊन जाणारी गवळण, द्वारपाल, वाजंत्री, मंत्री, विविध प्राणी, पक्षी
ठेवलेली होती. ते सर्व बघून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.
मी लहान असताना प्रत्येक घरात
किल्ले बनवले जात होते. गावातील सर्व मुले आपल्या आपल्या घरी किल्ले बांधत असत.
त्या मुलांमध्ये एक प्रकारची चढाओढ मात्र नक्की असायची, त्यामुळे प्रत्येकजण
दरवेळी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा. दिवाळी सुट्टी पडण्यापूर्वी जेव्हा
संहामाई परीक्षा सुरू असायच्या तेव्हापासूनच आमची किल्ला बनवायची लगबग सुरू
व्हायची. परीक्षेपेक्षा किल्ला जास्त महत्वाचा होता तेव्हा. किल्ला बनवायची तयारी
लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव करण्यापासून सुरू व्हायची. आम्ही सर्व मित्र
नदीकाठाची मळीची लाल माती सायकलवरून पोती भरून आणून ठेवायचो. त्यासाठी बऱ्याचदा
घरच्यांचा ओरडा किंवा कधीकधी मारसुद्धा खावा लागायचा . त्यानंतर लागणारे दगड,
विटा, जुन्या घरावरील मातीच्या खापऱ्या, गोणपाट (धान्य भरून ठेवायची पोती), जुन्या
वह्यांची पूठ्ठे, कोळश्यापासून बबनवलेला काळा रंग, चुना, मोहरी, हळीव, खपली, आणि
शेवटी सलाईन पाइप. सलाईन पाइप गावात मिळाली तर ठीक नाहीतर कधी कधी ४ - ५ किलोमीटर
लांब साईकल वरून गणेशवाडीला जाऊन डॉक्टर ना विनंती करून वापरलेली सलाईन आणावी
लागे. त्या सलाईन मुळे काही अडचण निर्माण होईल याची तेव्हा काळजी नसायची.
सहामाई परीक्षा झाली की त्या दिवशी पासून किल्ला बनवण्याचे काम सुरू. तेव्हा किल्ल्यांचे आत्तासारखे ऑनलाइन मॅप मिळत नसल्यामुळे आपल्या मनाला येईल तसा किल्ला बनवायचा आणि आपल्या आवडीच्या किल्ल्याचे नाव ठेवायचे. सुरवतीचे दोन दिवस किल्ल्याचा आराखडा बनवण्यातच जायचा. त्यानंतर सगळे दगड, विटा आणि मिळेल ते साहित्य व्यवस्थित मांडून त्यावर गोणपाट टाकायचो. माती-शेण पाण्यात व्यवस्थित मिसळून तयार केलेल्या किल्यावर दोन तीन वेळा शिंपडायचो. ते ओलं असतानाच त्यावर हळीव, मोहरी टाकायचो जेणेकरून दोन तीन दिवसात किल्ल्यावर झाडे उगवून येतील. किल्ल्याच्या भोवती उरलेली माती टाकून शेतीसाठी जमीन तयार केली करायचो. किल्ल्याभोंवती विटा-दगडांची तटबंदी व बुरूज तयार करायचो. आजूबाजूच्या जागेत शेती, विहीर, डोंगरकडे, गुहा, किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या, दोरा आणि काडेपेटी च्या काड्यापासून झुलता पूल बनवायचा. दुतर्फा खपली पेरून रस्ता दाखवायचा.
किल्ला तयार करत असताना तो बाकीच्यांच्यापेक्षा वेगळा
करण्याचा प्रयत्न नक्की असायचा. त्यासाठी जुन्या वह्यांची कमान, तटबंदी आणि बुरूज
बनऊन त्यावर कोळश्याचा काळा रंग आणि पांढरा चुना रंग लाऊन हुबेहूब दगडांपासून
बनवल्याचा भास निर्माण करायचो. मातीची भलीमोठी मगर किल्ल्याभोवती करून जुन्या
खापरीपासून तिचे तोंड बनवून पूर्ण अंगावर फोडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचे टरफल
लावायचो. काचेच्या गोट्या डोळ्यांच्या ठिकाणी ठेऊन मगर आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न
असायचा. शेजारी सलाईन पासून कारंजे बनवायचे किंवा मग एका सुई वर टोपण ठेऊन सलाईनला
संपलेल्या पेनचे रीफील जोडून पेंनच्या रीफीलचा समोरच बॉल काढून जोरात पानी मारून
ते टोपण फिरवायची सोय करून फिरता कारंजा बनवायचा. ह्या सगळ्यात कहर म्हणजे
किल्ल्यापासून लांबवर एक खड्डा खणून त्यामध्ये शेकोटी करून जुन्या पाइप चा वापर
करून त्याचा धूर किल्ल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून काढायचो.
इतक सगळं करून २ – ३ दिवस सलाईन ने पानी मारून सगळी मोहरी, हळीव आणि खपली उगवून यायची वाट बघायची. त्यानंतर जे काही पाच दहा रुपये मिळायचे त्यांचे प्लॅस्टिक चे सैनिक आणून किल्ल्यावर ठेवायचे. कधी कधी कुणाकडून फुटलेले, किंवा जुने झालेले प्लास्टर चे सैनिक मिळायचे त्यानाच रंग लावून जागोजागी ठेवायचो. दरवेळी किमान शिवाजी महाराजांचा पुतळा तरी विकत घ्यायचा प्रयत्न असायचा पण ते पण शक्य व्हायचं नाही. कधी कधी काहीजण किल्ला बनवायची स्पर्धा ठेवायचे. माझ महाराजांबद्दल वाचन चांगल असल्यामुळे गावी आणि मामाच्या गावीसुद्धा उत्तर सांगायला पुढे असायचो.
आता कामाच्या व्यापात किल्ला
बनवायला वेळ मिळत नाही परंतु त्यातून वेळ काढून गावी लहान भावाला किंवा काही मूल
सामूहिक किल्ला बनवत असतात तिथे जाऊन का होईन पण ते पूर्वीचे दिवस जगता येतात. आता
या दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेतील मुलांना किल्ला बनवायला सांगितले आहे परंतु
त्यामधील किती मुले किल्ला बनवतील याची खात्री नाही. पूर्वी मुलांना मातीत खेळू
नका म्हणून मार मिळायचा पण आता त्या उलट मुलांना घरचे सर्व साहित्य पुरवून सुद्धा
किल्ला करायला आवडत नाही. किल्ला बनवल्यामुळे मुलांमधील सृजनशीलता वाढते, शिवाजी
महाराज आणि आपल्या इतिहासाची जाणीव होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलं काही
वेळ मोबाईलच्या जंजाळापासून दूर राहतात.
आता तर प्लास्टर पासून बनवलेले तयार किल्ले मिळायला लागलेत आणि काही हौशी पालक ते मुलांना घेऊनसुद्धा देतात पण यामुळे मुलांचे नवनिर्मितीचे कौशल्य मरत असते. किमान इथून पुढे तरी पालक अश्या कल्पनाशक्ती वाढवणाऱ्यां गोष्टी मुलांना करण्यासाठी प्रेरित करतील आणि स्वतः मुलेसुद्धा स्वयंस्पूर्तीने भाग घेतील अशी आशा करूया.
धन्यवाद..
:
- विनोद अशोक आंबी.
(9960688784)
No comments:
Post a Comment