माझा शब्दप्रपंच-5
नवा निवारा
लॉकडाऊन मधील आजची सकाळ नेहमीप्रमाणेच उगवली पण ती नेहमीसारखी साधी नव्हती. ती नवीन काहीतरी धडा देऊन जाणारी होती.
तर झालं असं की,......
आज सकाळीच घरातील प्रत्येकजन काहीना काही कामानिमित्त बाहेर गेलेले.नेहमी प्रमाणे आवरून पोटपूजा करून निवांत वरच्या खोलीत बसलेलो होतो. खालच्या खोलीतून काहीतरी पडलेला आवाज आला म्हणून खाली येत होतो, नक्कीच मांजर दूध पिण्यासाठी आलेलं असणार म्हणून थोडं रागातच खाली आलो तर समोर मांजरच हाजीर. मांजराला हटकून बाहेर पडतचं होतो इतक्यात लहान मांजरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जाऊन बघितलं तर त्या मांजरीने सकाळीच कुठून तर पिलांना इकडे टेबल खाली अडचणीत शिफ्ट केलेलं. दोनही पिलं खूप छान होती म्हणून टेबल खालची अडचण दूर करून त्यांना फिरायला थोडी जागा केली आणि मी माझी कामं करायला निघून गेलो. नंतर घरचे येतील तसं सगळ्यांना ती पिलं दाखवल्यावर सगळ्यांनाच ती आवडली. तसं बघितलं तर आमच्या घरच्यांनी आम्हाला लहानपणापासून कुत्री, मांजरं कधी पाळूच दिलेलं नव्हतं म्हणून वाटलं त्यांना आवडणार नाहीत, पण त्यांना सुद्धा ती दोनही पिलं आवडली. पिलं जरी छान असली तर आता काळजी ह्या गोष्टीची होती की एकदा हटकलेली मांजरी परत येईल का?
जेवून झाल्यावर अर्धा तास पिलांजवळ बसून त्यांच्या आईची वाट बघितली पण तिचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी बहिणीनं त्यांच्यासाठी दूध नेऊन ठवलं आणि आम्ही तिथून निघून गेलो. थोड्या वेळाने चमच्याने दूध द्यायचा प्रयत्न केला पण सगळंच व्यर्थ. आता संध्याकाळचे सहा वाजत आले होते तरी पिलांच्या आईचा पत्ता नव्हता असा विचार करत असतानाच ती मांजरी परत दिसली पण आम्हा सगळ्यांना तिथं पाहून तिचं यायचं धाडस झालं नसेल. ती परत निघून गेली. सकाळपासून उपाशी पिलांची काळजीत भरच पडत होती.
आमच्या सगळ्यांनाच अस वाटत होतं की त्या पिलांच्या आईनं यावं आणि इथंच रहावं. पण हे पण माहिती होत की एकदा का माणसाची चाहूल लागली की मांजरी त्या ठिकाणी पिलांना ठेवत नाहीत. आता त्या मांजरीला घरी यायला काहीच अडचण नव्हती कारण तिला सहज येता यावं म्हणून घराचे सगळे दरवाजे पण उघडे ठेवले होते. संध्याकाळचे सात वाजल्यावर ती माऊली पुन्हा सगळं धाडस करून शेवटी परत आलीच. तीन त्या दोन पिलांपैकी एकाच्या मानेला हळूच पकडून जाऊ लागली. एरवी उंदरांना खाणारे तिचे दात नाजूक पिलांना काहीच कसं लागत नसतील? घराशेजारी काही कुत्री फिरत होती म्हणून मी पण तिच्या मागे लपून जात होतो. इतक्यात ती एका शेजारच्या घरी शिरली. पण त्यांनी तिला हाकलून लावलं न ती त्या पिलाला घेऊन कुठे गेली कळलंच नाही. मी परत घरी आल्यानंतर आमचं लक्ष त्या दुसऱ्या पिलाकडेच होते. सकाळपासून त्याच्यासोबत कोणीतरी होते आता ते पण नाही म्हंटल्यावर त्याला कसे वाटत असेल यांचाच विचार चालू होता. आता तर ते भुकावलेलं बिचारं ठवलेलं दूध सुद्धा पित होतं. आता घरात सगळ्यांनाच अस वाटत होत की आता हे पिल्लू आपण ठेऊन घेऊ कारण आता तर ते दूध सुद्धा पित होतं. पण त्याचा आईपासून त्याची ताटातूट व्हावी असं सुद्धा वाटत नव्हतं.
आता वाट बघून वेळ होत आलेला तस आम्ही जेवायला बसलो इतक्यात ती मांजरी परत आली. आम्ही सर्वजण बघतच राहिलो की तिनं त्या पिलालासुद्धा धारदार दातांनी पण मायेच्या हळुवारपणे अलगद उचलून घेतलं आणि ती निघाली..... आपल्या पिलांसाठी नवा निवारा शोधायला.



No comments:
Post a Comment